रहाटणीतील लिटल मास्टर्स प्रीस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात
सतरा वर्षांच्या यशस्वी शैक्षणिक प्रवासाचा जल्लोष ; विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांनी जिंकली उपस्थितांची मने
पिंपरी : प्रतिनिधी
रहाटणी येथील गायत्री शिक्षण संस्थेच्या लिटल मास्टर्स प्रीस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
२००९ साली स्थापन झालेल्या या संस्थेने यंदा यशस्वीपणे १७ वर्षांचा टप्पा पूर्ण केला असून त्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत शाळेच्या शैक्षणिक वाटचालीचा आनंदोत्सव साजरा केला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल उर्फ नाना काटे (माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका) उपस्थित होते.
तसेच उद्योजक राजेश भुजबळ, उद्योगजक चेतन काळभोर, महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील संतोष जाधव, उद्योजक प्रवीण कदम, उद्योजक बाळासाहेब काकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना नाना काटे यांनी संस्थेच्या गेल्या सतरा वर्षांतील शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रीस्कूल स्तरावरील शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करत त्यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यानंतर संस्थेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्याविष्कार, सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिका, पारंपरिक वेशभूषेतील सादरीकरणे आणि गाणी यांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. रंगमंचावर आत्मविश्वासाने सादरीकरण करणाऱ्या चिमुकल्यांनी पालक व मान्यवरांची मने जिंकली.
या प्रसंगी संस्थेच्या संचालिका व प्राचार्या दया माळी यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेतला. संचालक व उद्योजक अशोक माळी यांनी पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळेच संस्थेला यश मिळाल्याचे सांगितले.

कार्यक्रमास शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात उत्साह, आनंद आणि अभिमानाचे वातावरण पहायला मिळाले.








