दहावी बोर्ड परीक्षा काळात पवनाथडी जत्रा कशाला?
दहावी बारावी बोर्ड परीक्षा काळात पवनाथडी जत्रा कशाला?
राजकीय हट्टापायी विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला
जनसेवक अमित पसरणीकर यांचा घणाघात
पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात दहावी व बारावीच्या अत्यंत महत्त्वाच्या बोर्ड परीक्षा सुरू असताना पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक कार्यकर्ते अमित पसरणीकर यांनी या निर्णयावर जोरदार टीका करत, विद्यार्थ्यांच्या भविष्यापेक्षा जत्रा महत्त्वाची कशी? असा थेट सवाल उपस्थित केला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,सामाजिक विकास विभागाच्या वतीने सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर २५ ते १ मार्च या कालावधीत आयोजित पवनाथडी जत्रा महिला बचत गटांसाठी उपयुक्त असल्याचे मान्य करतानाच, यंदा तिच्या वेळापत्रकावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा असताना शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी खेचणारा कार्यक्रम आयोजित करणे हे प्रशासनाचे दुर्लक्ष की जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय, असा प्रश्न पसरणीकर यांनी विचारला आहे.
या जत्रेमुळे होणारी प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी, ध्वनीप्रदूषण आणि सार्वजनिक हालचालींची वाढ याचा थेट व अप्रत्यक्ष परिणाम परीक्षा केंद्रांच्या परिसरावर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शांत, सुरक्षित आणि एकाग्रतेस पूरक वातावरण देणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी असताना ती पाळली जात नसल्याचा आरोप पसरणीकर यांनी केला.
यासोबतच राजकीय मंडळींचा राजकीय हट्ट आणि प्रतिष्ठेचा प्रश्न यामागे असल्याची टीका त्यांनी केली.
“महिलांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणे योग्य नाही. जत्रा काही दिवस पुढे ढकलली असती तर प्रशासनाची प्रतिष्ठा कमी झाली असती का?” असा घणाघात पसरणीकर यांनी केला आहे.
——
पालकांनी घरी मुलांचा अभ्यास घ्यायचा की जत्रेत फिरायचे?
दहावी-बारावीच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत निर्णायक टप्पा. अशा काळात घराघरांत अभ्यासाचे वातावरण असणे अपेक्षित असताना शहरात जत्रेची लगबग सुरू आहे.
जत्रेमुळे वाढणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि ध्वनीप्रदूषण याचा परिणाम केवळ विद्यार्थ्यांवरच नव्हे तर पालकांवरही होतो. मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना मानसिक आधार देणे आणि शांत वातावरण निर्माण करणे ही पालकांची जबाबदारी असते.
मात्र परीक्षा काळातच जत्रेचे आयोजन झाल्याने पालकांसमोर
मुलांच्या भविष्याला प्राधान्य द्यायचे की उत्सवाच्या आकर्षणाला? असा प्रश्न उभा राहिला आहे.








