शहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

दिघीत ‘कौशल्य – Drug Free Campus’ अभियानांतर्गत पोलिसांची अंमली पदार्थ विरोधात व्यापक जनजागृती


ड्रग्जला नाही म्हणत पोलिसांकडून तरुणाईला व्यसनमुक्तीचा संदेश

 

दिघीत ‘कौशल्य – Drug Free Campus’ अभियानांतर्गत पोलिसांची अंमली पदार्थ विरोधात व्यापक जनजागृती

 

दिघी : अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यापासून तरुण पिढीला दूर ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने व्यापक जनजागृती अभियान हाती घेतले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘कौशल्य – Drug Free Campus’ या अभियानांतर्गत परिमंडळ-३ स्तरावरील अमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम अजिंक्य डी. वाय. पाटील कॉलेज, दिघी येथे उत्साहात पार पडला.
विद्यार्थी आणि युवकांमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाबाबत जागरूकता निर्माण करणे, व्यसनाच्या दुष्परिणामांची माहिती देणे आणि शैक्षणिक परिसर अमली पदार्थमुक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांना चालना देणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमास परिमंडळ-३चे पोलीस उपायुक्त मारुती जगताप, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश जैन, उपकुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर, मानसिक पुनर्वसन व मुक्ती केंद्र, भोसरी येथील डॉ. मोरे, एमआयडीसी भोसरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव, चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश रांजणकर, दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे, तसेच परिमंडळ-३ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अँटी नार्कोटिक सेलचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

परिमंडळ-३च्या हद्दीतील विविध शाळा आणि महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षकवृंद तसेच अजिंक्य डी. वाय. पाटील कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते.
यावेळी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती देण्यात आली. अमली पदार्थांचे व्यसन हे केवळ व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करणारे नसून, त्याचा मानसिक स्वास्थ्य, कुटुंब आणि समाजावरही विपरीत परिणाम होतो. युवकांनी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांनी योग्य संगत निवडणे, कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद कृतीकडे दुर्लक्ष न करणे आणि गरज भासल्यास पालक, शिक्षक अथवा संबंधित यंत्रणांची मदत घेणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. अमली पदार्थमुक्त समाज उभारण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून पुढाकार घेण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

कार्यक्रमादरम्यान पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अँटी नार्कोटिक सेलच्या 7798100112 या हेल्पलाईन क्रमांकाची उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि प्राचार्यांमध्ये माहिती देऊन व्यापक प्रसिद्धी करण्यात आली. अमली पदार्थांशी संबंधित कोणतीही माहिती किंवा संशयास्पद बाब आढळल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
‘Drug Free Campus’ या उपक्रमाला उपस्थित मान्यवर, प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पोलीस प्रशासन आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्रितपणे काम केल्यास युवकांना व्यसनाच्या विळख्यापासून दूर ठेवणे शक्य होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत प्रभावी जनजागृती करून अमली पदार्थमुक्त, सुरक्षित आणि निरोगी शैक्षणिक परिसर निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *