क्राईमताज्या घडामोडीशहर

औद्योगिक क्षेत्रातील खंडणीखोरीला पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका


औद्योगिक क्षेत्रातील खंडणीखोरीला पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका
पाच कोटींची खंडणी मागून २५ लाख स्वीकारताना चौघे जाळ्यात ; एमआयडीसी भोसरीतील कंपनीला खंडणीखोरांकडून धमकी

पिंपरी :  प्रतिनिधी

 

औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना धमकावून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने मोठा दणका दिला. एमआयडीसी भोसरी परिसरातील एका खासगी कंपनीच्या प्रतिनिधीकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागून त्यातील २५ लाख रुपये स्वीकारताना चार आरोपींना सापळा रचून अटक करण्यात आली.
कंपनीची कागदपत्रे माहिती अधिकाराच्या माध्यमातून काढल्याचे सांगत आरोपींनी कंपनीच्या प्रतिनिधीवर दबाव आणला. तसेच कंपनीचे काम योग्य नसल्याचे सांगून, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असल्यास पाच कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. पैसे न दिल्यास कंपनीची वाट लावण्याबरोबरच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी मागील सुमारे सहा महिन्यांपासून कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून खंडणीची मागणी करीत होते. या प्रकाराची माहिती मिळताच खंडणीविरोधी पथकाने तक्रारीची गंभीर दखल घेत नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला.

 

या प्रकरणी राहुल प्रेमनारायण मिश्रा (३८), अल्ताफ उस्मान जानवेकर (५३), रमेश भिमा मांजरेकर (३९) आणि सुनील राजेंद्र कानू (३५) यांना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६१३/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेतील कलम ३०८(३), ३०८(४), ३०८(५) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२५ लाखांची रोकड स्वीकारताना कारवाई
आरोपी सुनील कानू याच्या ताब्यातील मारुती सुझुकी XL-6 या वाहनातून आरोपी फिर्यादीकडे आले होते. त्यानंतर खंडणीच्या रकमेबाबत चर्चा झाली. आरोपी राहुल मिश्रा याने फिर्यादीकडून २५ लाख रुपये रोख रक्कम काळ्या रंगाच्या बॅगेत स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याचवेळी पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले.
‘खंडणीखोरीला कोणतीही माफी नाही’
औद्योगिक परिसरातील उद्योजक, व्यावसायिक अथवा आस्थापनांवर दबाव आणून पैसे मागणे, धमकी देणे, जबरदस्ती करणे किंवा गुन्हेगारी टोळ्यांच्या माध्यमातून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

 

“औद्योगिक विकासाला अडथळा आणणारी कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही. उद्योजक व व्यावसायिकांनी कोणत्याही दबावाला किंवा धमकीला बळी न पडता तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी,” असे पोलिसांनी स्पष्ट केले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड तसेच अंमलदार अभिमन्यू बनसोडे, सुनील कानगुडे, किशोर कांबळे, प्रदीप पोटे, किरण जाधव, चंद्रकांत जाधव, प्रदीप गोडांने आणि दादाभाऊ साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
खंडणीची मागणी अथवा धमकी मिळाल्यास नागरिकांनी खंडणीविरोधी पथक/गुन्हे शाखेच्या हेल्पलाइन क्रमांक ७५१७५१७५९३ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *