कप–बशीच्या चिन्हातून लोकसेवेचा संदेश
प्रभाग ३२ मध्ये अपक्ष उमेदवार दिलीप तनपुरे सरांची साधी, शांत आणि लोकाभिमुख प्रचारपद्धती चर्चेत
पिंपरी : प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३२ मधून अपक्ष उमेदवार म्हणून दिलीप तनपुरे यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर निवडणूक आयोगाकडून त्यांना कप–बशी हे निवडणूक चिन्ह बहाल झाले आहे. हे चिन्ह म्हणजे आपले राजकीय गुरू, स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांचेच आशीर्वाद असल्याची भावना सांगवी व नवी सांगवी परिसरातील नागरिक व्यक्त करत असून, याबाबत सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे.

कोणताही गाजावाजा, मिरवणूक किंवा शक्तीप्रदर्शन न करता, आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करत दिलीप तनपुरे यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. घरोघरी जाऊन थेट मतदारांशी संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला असून, प्रचारादरम्यान केवळ सात जणांच्या उपस्थितीत (त्यामध्ये पत्नी मंदाकिनी तनपुरे यांचाही समावेश आहे) ते प्रचार करत आहेत. नागरिकांना कोणतीही अडचण न होता देखील प्रभावी प्रचार करता येतो, हे त्यांनी प्रभाग क्रमांक ३२ मध्ये दाखवून दिले आहे.
नागरिकांशी संवाद साधताना दिलीप तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. निवडून आल्यानंतर प्रभागातील कोणताही निर्णय हा नागरिकांच्या सहभागाशिवाय घेतला जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. विकासकामे असोत वा प्रभागाच्या हिताचे निर्णय, प्रत्येक बाबीत नागरिकांचा सक्रिय सहभाग राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नगरसेवक पद म्हणजे सत्ता किंवा मालकी नसून, जनतेने उमेदवारावर दाखवलेल्या विश्वासाची जबाबदारी आहे, असे सांगत त्यांनी ट्रस्टीची उपमा दिली. ज्या प्रकारे एखादा ट्रस्टी संस्थेचा कारभार विश्वासाने सांभाळतो, त्याचप्रमाणे आपण प्रभागाचा ट्रस्टी म्हणून काम करून सर्वांगीण विकास साधू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.साधेपणा, शांतता आणि लोकाभिमुखता ही त्यांच्या प्रचाराची ओळख ठरत असून, याच कारणामुळे प्रभाग क्रमांक ३२ मध्ये अपक्ष उमेदवार दिलीप तनपुरे यांची चर्चा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.








