पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आप’चा जोरदार शंखनाद
रविराज काळे यांची ‘आप लढणार, बदल घडणार’ मोहीम चर्चेत
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी : भ्रष्टाचार, गुंडगिरी, भांडवलशाही आणि घराणेशाहीच्या राजकारणाला ठाम आव्हान देणारा आम आदमी पक्ष (आप) पिंपरी-चिंचवडमध्ये वेगाने आपली पावले रोवू लागला आहे. शहराध्यक्ष रविराज बबनराव काळे यांच्या नेतृत्वाखाली ‘आप लढणार, बदल घडणार’ या घोषणेसह सुरू झालेल्या जनसंवाद मोहिमेमुळे स्थानिक राजकारणात नवी चर्चा रंगू लागली आहे. प्रभाग क्रमांक २६ (पिंपळे निलख, कस्पटे वस्ती, विशाल नगर, वाकड) येथे नागरिकांशी थेट संवाद साधत काळे यांनी पक्षाच्या गॅरंटींवर भर दिला.

दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली मोफत वीज, पाणी, दर्जेदार शिक्षण व आरोग्यसेवेच्या योजनांनी सामान्य कुटुंबांना दिलासा दिला, तर पंजाबमध्ये भगवंत मान सरकारने शेतकरी व तरुणांसाठी ठोस निर्णय घेतले. हाच विकासाचा मॉडेल पिंपरी-चिंचवडमध्ये राबवण्याचा आपचा निर्धार असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले. “भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि नागरिककेंद्रित प्रशासन हेच आमचे ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले.
आपच्या गॅरंटींमध्ये महिलांसाठी मोफत बससेवा, मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण, सर्वांसाठी आरोग्यसेवा, घरपोच सरकारी योजना, कचरामुक्त व ट्रॅफिकमुक्त शहराचा समावेश आहे. याशिवाय २० हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती आणि प्रत्येक कुटुंबाला मोफत पाणीपुरवठ्याचे आश्वासन देण्यात आले आहे. वाढती ट्रॅफिक कोंडी, कचरा व्यवस्थापन आणि बेरोजगारीसारख्या स्थानिक प्रश्नांवर तातडीने उपाय केले जातील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

या मोहिमेमुळे तरुण व महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पक्षात नव्या सदस्यांची भर पडत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ची वाढती ताकद पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात बदलाची नांदी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.








