नवी सांगवीत कप-बशी चिन्हामुळे भावनिक लढत
पायल अमित पसरणीकर यांना अधिकृत निवडणूक चिन्ह
पिंपरी : प्रतिनिधी : नवी सांगवी परिसरात “नवी सांगवीकर यांचा उमेदवार” अशी ओळख निर्माण केलेल्या पायल अमित पसरणीकर यांना प्रभाग क्रमांक ३१ (क) मधून कप-बशी हे निवडणूक चिन्ह अधिकृतपणे मिळाले आहे. या घडामोडीमुळे नवी सांगवी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक नागरिकांसाठी हा क्षण भावनिक ठरत आहे.
दिवंगत आमदार स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर कप-बशी चिन्ह मिळाल्याने, हा जणू त्यांच्या आशीर्वादाचाच क्षण असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे २००९ च्या निवडणुकीत लक्ष्मणभाऊंना जनतेपर्यंत पोहोचवणारे हेच चिन्ह आज त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची स्वप्ने पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा समोर आले आहे.

अमित पसरणीकर यांना उमेदवारी नाकारल्यानंतर नवी सांगवीतील नागरिक, आजी-माजी नगरसेवक तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले होते. “भाऊ, आता माघार नाही” असा ठाम संदेश देत नागरिकांनी निवडणूक रिंगणात ठाम राहण्याची मागणी केली होती. त्या भावनांचा सन्मान राखत पायल अमित पसरणीकर यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली, आणि आता कप-बशी चिन्हासह निवडणुकीला सामोरे जात आहेत.कप-बशी हे केवळ निवडणूक चिन्ह नसून, ते निष्ठा, विश्वास आणि संस्कारांची परंपरा असल्याची भावना समर्थक व्यक्त करत आहेत.
“लक्ष्मणभाऊ गेले असले, तरी त्यांचे विचार, त्यांची लढाई आणि त्यांचे चिन्ह आजही जिवंत आहे,” अशा शब्दांत नागरिक आपल्या भावना व्यक्त करत आहेत.या पार्श्वभूमीवर नवी सांगवीकरांनी “लक्ष्मणभाऊंचा आशीर्वाद घेऊन कप-बशी चिन्हाला साथ द्या” असा निर्धार व्यक्त केला असून, प्रभाग क्रमांक ३१ (क) मधील निवडणूक लढत अधिक भावनिक आणि चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.








