ताज्या घडामोडीशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

आजची तरुण पिढी विकसित भारताचे भवितव्य; कारगिलचे धडे जीवनात उतरवा – कर्नल हेमंत वासवानी


आजची तरुण पिढी विकसित भारताचे भवितव्य; कारगिलचे धडे जीवनात उतरवा – कर्नल हेमंत वासवानी

पिंपरी  : प्रतिनिधी

“आजची तरुण पिढी ही विकसित भारताचे भवितव्य आहे. विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात ठेवावे की, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे,” असे प्रेरणादायी विचार डेप्युटी कंट्रोलर, सीक्यूएचे कर्नल हेमंत वासवानी यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर, नूतन माध्यमिक विद्यालय व शिशुविहार, सांगवी यांच्या वतीने आयोजित कारगिल विजय दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

 

कर्नल वासवानी म्हणाले, “आम्ही युद्धभूमीवर असताना विजय मिळेल की नाही, याची खात्री नसते; मात्र ‘जिंकणार आम्हीच’ हा दृढ आत्मविश्वास मनात ठेवूनच प्रत्येक सैनिक लढत असतो. याच जिद्दीच्या बळावर भारताने कारगिल युद्धात विजय मिळवला. कोणतेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते प्रथम मनापासून पाहावे, त्यावर विश्वास ठेवावा आणि सातत्याने प्रयत्न करावेत.”
स्वतःच्या प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले, “मीदेखील एका सामान्य कुटुंबातून आलो आहे. लहानपणापासून सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहिले आणि आज ते स्वप्न पूर्ण झाले आहे. भीती न बाळगता सत्याला सामोरे जा, सातत्याने प्रयत्न करा; यश निश्चित मिळेल.”
शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने व शिक्षकवर्गाचे कौतुक करताना ते म्हणाले, “या शाळेला सक्षम नेतृत्व आणि आदर्श शिक्षक लाभले आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे.”
यावेळी बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुमारे दोन हजार राख्या कर्नल वासवानी यांच्या हस्ते सीमेवर देशसेवा बजावणाऱ्या जवानांना पाठविण्यात आल्या. संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता. उपस्थितांनी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार रामभाऊ खोडदे, सचिव तुळशीराम नवले, सातारा मित्र मंडळाचे सचिव सोमनाथ कोरे, मुख्याध्यापक शिवाजीराव माने, जयहिंद फाउंडेशनच्या अध्यक्षा निशा जगताप, राजश्री पोटे, कैलास म्हस्के आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शीतल शितोळे, संगीता सूर्यवंशी, सुनिता टेकवडे, सीमा पाटील, दत्तात्रय जगताप, स्वप्नील महाराज कदम, हेमालता नवले, मनीषा लाड, चेतना शिंदे, श्रद्धा जाधव, वर्षाराणी माने, संदीप डावरे, प्रतिमा दुबळे, भारती घोरपडे, निर्मला भोईटे, निता ढमाले, अश्विनी करे, कुसुम ढमाले आणि मनीषा गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक दत्तात्रय जगताप यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *