सीमावर्ती गावांमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
सीमावर्ती गावांमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
पुणे : प्रतिनिधी
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठवाडा जनविकास संघ, पुणे व शारदा प्रतिष्ठान भालकी (जि. बिदर) यांच्या संयुक्त विद्यमाने भालकी तालुक्यातील अट्टरगा, गुंजरगा, माणकेश्वर आणि बसवनवाडी येथील सहकारी प्राथमिक शाळांमध्ये विविध ज्ञानवर्धक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सीमावर्ती भागात मराठी भाषा आणि संस्कृतीचा जागर राखण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थ व मराठी प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

“अभिमान मराठीचा, उत्सव मराठी भाषेचा” या ब्रीदवाक्याला अनुसरून सीमावर्ती भागातील मराठी शाळा आणि शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. मराठी भाषेचे महत्त्व आणि संवर्धन या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान घेण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी जनजागृती करण्यात आली.
या प्रसंगी शाळांना शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा जपणारे ग्रंथ देण्यात आले. यात भारताचे संविधान, ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महाराज गाथा तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी अरुण श्रीपती पवार (संस्थापक/अध्यक्ष, मराठवाडा जनविकास संघ) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. दिनकर मोरे (विश्वस्त, शारदा प्रतिष्ठान भालकी) , ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज, सूर्यकांत कुरुलकर, दत्तात्रय धोंडगे, प्रा. रविंद्र खांडेकर, सुधाकर थिटे, किशोर अट्टर्गेकर, तुकाराम नारायणराव मोरे, हरिदेव रुद्रमणी, तुकाराम शेडोळे, अमृत अक्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी ही आपली मायबोली असून ती सीमावर्ती भागात जपणे व पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.








