महाराष्ट्रराजकीय

शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांच्या ‘त्या’ कृतीने जिंकली मने


विजयाच्या जल्लोषात नागरिकांनी अनुभवला माणुसकीचा क्षण

शत्रुघ्न काटे यांच्या ‘त्या’ कृतीने जिंकली पिंपळे सौदागरकरांची मने

पिंपरी : प्रतिनिधी

राजकारणात विजय-पराभव हे आलेच, मात्र त्या क्षणातही माणुसकी जपणारे नेतृत्व विरळाच असते. मनपा निवडणुकीतील प्रभाग क्रमांक २८, पिंपळे सौदागर येथे नवनिर्वाचित नगरसेवक व भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दाखवलेली एक साधी पण अत्यंत भावस्पर्शी कृती संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

भाजप पॅनेलमधून शत्रुघ्न काटे, अनिता काटे व कुंदा भिसे हे तीन उमेदवार विजयी झाले, तर पॅनेलमधीलच संदेश काटे यांना पराभव स्वीकारावा लागला. निकालानंतर विजयाचा जल्लोष सुरू असताना नागरिकांनी आनंदात शत्रुघ्न काटे यांच्या गळ्यात फुलांची माळ घातली. त्या क्षणी अनेकांचे लक्ष केवळ जल्लोषाकडे होते; मात्र पुढच्याच क्षणी घडलेला प्रसंग सर्वांच्या काळजाला भिडणारा ठरला.
शत्रुघ्न काटे यांनी आपल्या गळ्यातील तीच फुलमाळ क्षणाचाही विचार न करता शेजारी उभे असलेले पराभूत सहकारी उमेदवार  संदेश काटे यांच्या गळ्यात घातली.

 

“विजय एकट्याचा नसतो, आणि पराभवही कुणाचा एकट्याचा नसतो,” हा संदेश त्यांच्या कृतीतून अधोरेखित झाला.
विजयाच्या शिखरावर उभा असतानाही सहकाऱ्याच्या भावना जपणारे, त्याला सन्मान देणारे नेतृत्व पाहून उपस्थित नागरिक भावूक झाले. यावेळी उपस्थितांच्या तोंडून “हेच खरे नेतृत्व” असे शब्द नकळत बाहेर पडले.

राजकारणात आरोप-प्रत्यारोप, कटुता आणि दरी वाढत असताना, शत्रुघ्न काटे यांच्या या कृतीने संघभावना, एकोप्याचा संदेश आणि माणुसकीचा आदर्श दिला आहे. हा केवळ विजयाचा क्षण नव्हता, तर पिंपळे सौदागरच्या राजकीय संस्कृतीत नवा, सकारात्मक अध्याय लिहिणारा प्रसंग ठरला आहे.

 


 

उद्या पिंपळे सौदागरमध्ये होणार सत्कार समारंभ

प्रभाग क्रमांक २८, पिंपळे सौदागर येथील भाजप पॅनेलमधील उमेदवारांच्या विजयाबद्दल उद्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सत्कार समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेतही  शत्रुघ्न काटे,अनिता काटे,कुंदा भिसे व
संदेश काटे या चारही उमेदवारांचे फोटो समाविष्ट करण्यात आले आहेत.

याद्वारे संघभावनेचा व एकोप्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *