स्मार्ट सांगवी प्रोजेक्टद्वारे नागरी समस्यांसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू
निलिमा महेश भागवत यांचा सांगवीकरांसाठी स्तुत्य उपक्रम
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
नागरिकांच्या दैनंदिन समस्या त्वरित, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने सोडविण्याच्या उद्देशाने “स्मार्ट सांगवी प्रोजेक्ट” अंतर्गत नागरी समस्यांसाठी एक विशेष ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. हा उपक्रम प्रभाग क्रमांक ३२ मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार भागवत नीलिमा महेश यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून राबविण्यात आला आहे.
या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या किंवा मोबाईल अॅपद्वारे आपल्या तक्रारी सहज नोंदवता येणार आहेत. रस्त्यांची दुरवस्था, बंद पथदिवे, कचरा उचल, सांडपाणी समस्या, वाहतूक कोंडी, ध्वनी व वायू प्रदूषण तसेच भटके कुत्रे यांसारख्या विविध नागरी समस्यांबाबत तक्रारी नोंदविण्याची सुविधा या प्रणालीत उपलब्ध आहे.
तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित नागरिकाला त्वरित नोटिफिकेशन मिळणार असून, तक्रारीच्या सद्यस्थितीची माहिती (स्टेटस) वेळोवेळी तपासता येणार आहे. तक्रारीचे निराकरण झाल्यानंतर त्याबाबतची माहिती नागरिकांना देण्यात येईल. ठराविक कालावधीत समस्या सुटली नाही, तर ती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्याची तरतूदही या प्रणालीत करण्यात आली आहे. हे पोर्टल मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.
या वेळी बोलताना उमेदवार भागवत नीलिमा महेश यांनी सांगितले की, “नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होऊ नये, प्रत्येक समस्या वेळेत सुटावी आणि प्रशासन अधिक उत्तरदायी व्हावे, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. स्मार्ट सांगवी प्रोजेक्टच्या माध्यमातून सांगवीकरांना थेट आणि प्रभावी व्यासपीठ देणे हेच माझे ध्येय आहे.”
या उपक्रमामुळे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक सुलभ होणार असून, सांगवी परिसरातील नागरी समस्या जलदगतीने मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.








