ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रभाग २६ मध्ये ‘आप’चा थेट जनतेशी संवाद


रविराज काळे यांनी घराघरात जाऊन नागरिकांच्या प्रश्नांचा घेतला आढावा

पिंपरी | प्रतिनिधी :

प्रभाग क्रमांक २६ मध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या घराघरातील जनसंपर्क अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत ‘आप’चे कार्यकर्ते थेट नागरिकांच्या घरी जाऊन संवाद साधत आहेत.

प्रभाग २६ मध्ये ‘आप’चा थेट जनतेशी संवाद

या जनसंपर्क अभियानाअंतर्गत विशालनगर, कस्पटे वस्ती परिसर तसेच आयटी क्षेत्रातील नागरिकांशी सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी पाणीपुरवठ्याच्या समस्या, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, दैनंदिन नागरी सोयी-सुविधांचा अभाव तसेच प्रशासनातील पारदर्शकतेचा मुद्दा नागरिकांनी ठळकपणे मांडला.

जनसंपर्क मोहिमेचा उद्देश केवळ समस्या ऐकून घेण्यापुरता मर्यादित नसून, त्या समस्यांवर ठोस आणि व्यवहार्य उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याचा असल्याचे रविराज काळे यांनी सांगितले. प्रभागातील नागरी प्रश्नांवर सातत्याने काम केल्याचा अनुभव असून, प्रत्यक्ष कृतीतूनच नागरिकांचा विश्वास संपादन करण्यावर आम आदमी पार्टीचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या संवादात्मक उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम आदमी पार्टी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला. प्रभाग २६ मधील समस्या मुळापासून सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी हा जनसंपर्क उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत नागरिकांनीही व्यक्त केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *