ताज्या घडामोडीराजकीय

पक्षनिष्ठेला प्राधान्य देत नागेश मासाळ यांची पंचायत समिती निवडणुकीतुन माघार


महत्त्वकांक्षेपेक्षा पक्षनिष्ठा महत्वाची :  नागेश  मासाळ 

आमदार समाधान आवताडे यांच्या शब्दावर विश्वास ठेवत उमेदवारी अर्ज घेतला मागे

 

मंगळवेढा : प्रतिनिधी

मंगळवेढा पंचायत समितीच्या हुलजंती गणात राजकीय समीकरणांना नवा आयाम देणारा निर्णय नागेश मासाळ यांनी घेतला असून, त्यांच्या या भूमिकेची पंचक्रोशीत मोठी चर्चा सुरू आहे.

अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले नागेश मासाळ यांनी पक्षनिष्ठा आणि नेतृत्वावरचा विश्वास अधोरेखित करत मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

भाजपा मंगळवेढा तालुका युवा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले नागेश मासाळ हे भाजपकडून उमेदवारीचे प्रमुख इच्छुक होते. त्यामुळे त्यांना पक्षाकडून तिकीट मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत होती. मात्र पक्षाने हुलजंती येथील अर्जुन मल्लाळे यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर नागेश मासाळ यांनी “आधी पक्ष, मग मी” या भावनेतून स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपेक्षा पक्षाच्या हिताला प्राधान्य दिले.

 

आमदार समाधान आवताडे यांनी दिलेला शब्द पाळत व त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवत घेतलेला हा निर्णय अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या निर्णयामुळे हुलजंती पंचायत समिती गणात भाजपाचे उमेदवार अर्जुन मल्लाळे यांच्या विजयाचा मार्ग अधिक भक्कम झाला असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

या निर्णयानंतर नागेश मासाळ यांनी आमदार समाधान आवताडे यांची भेट घेतली असता, दादांनी “भविष्यात नक्की विचार करून योग्य संधी दिली जाईल” असा शब्द दिला आहे.


दरम्यान नागेश मासाळ हे सध्या आसबेवाडी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असून पंचक्रोशीतील विविध गावांमध्ये त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचा परिणाम केवळ पंचायत समिती गणापुरता मर्यादित न राहता, हुलजंती जिल्हा परिषद गटाच्या भाजप उमेदवार संगिता दुधाळ यांनाही याचा लाभ होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती शिवाजी पटाप यांच्यासह अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.

 

पक्षनिष्ठेचा आदर्श

• पक्षाने अर्जुन मल्लाळे यांना उमेदवारी दिल्यानंतर नागेश मासाळ यांनी घेतला अर्ज  मागे
• आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वावर विश्वास
• ‘भविष्यात नक्की संधी देऊ’ असा शब्द
• पंचायत समितीबरोबरच जिल्हा परिषद गटालाही फायदा होणार
• जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार संगिता दुधाळ यांच्या विजयासाठी पूरक वातावरण

—-

“राजकारणात पदांपेक्षा निष्ठेला अधिक महत्त्व आहे. आमचे मार्गदर्शक आमदार समाधानदादा आवताडे यांच्या शब्दावर आणि नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. दादांनी भविष्यात नक्की विचार करून संधी देण्याचे आश्वासन दिले असून, पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या विजयासाठी मी  काम करणार आहे,”
— नागेश मासाळ


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *