महाराष्ट्रराजकीय

प्रभाग क्रमांक २६ मध्ये आम आदमी पार्टीच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद


पिंपरी : प्रतिनिधी:  प्रभाग क्रमांक २६ मध्ये आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार काळे रविराज बबन यांच्या सुरू असलेल्या प्रचाराला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काल पिंपळे निलख, गावठाण आणि टकले नगर या भागांमध्ये प्रत्यक्ष भेटींच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला. घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यात आला तसेच त्यांच्या दैनंदिन समस्या, नागरी अडचणी आणि विकासाबाबतच्या अपेक्षा समजून घेण्यात आल्या.

कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य व शिक्षण अशा विविध मुद्द्यांवर नागरिकांनी मोकळेपणाने आपली मते मांडली. नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता, त्या सोडवण्यासाठी ठोस आणि कालबद्ध उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वास यावेळी देण्यात आला.

या प्रचारादरम्यान नागरिकांना गॅरंटी कार्ड चे वितरण करण्यात आले. या गॅरंटी कार्डच्या माध्यमातून मूलभूत नागरी सुविधा, पारदर्शक प्रशासन आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाबाबतची ठोस आश्वासने देण्यात आली. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, अनेक ठिकाणी प्रचाराला उत्साहात पाठिंबा आणि आशीर्वाद लाभले.

प्रभाग क्रमांक २६ चा विकास हा केवळ शब्दांत नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून साध्य केला जाईल, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होत असून, मिळणारा हा जनसमर्थन आगामी वाटचालीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *